(अमित झोडगे डावीकडून पहिला)
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागात सक्रिय असलेला एक तरूण कार्यकर्ता अमित झोडगे याला ‘मेरी क्युरी अर्ली स्टेज रिसर्चर फेलोशिप’ मिळाली. त्याबद्दल अमितचे कौतुक करण्यासाठी 14 जून 2013 रोजी, टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे एक कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला.
सर्व प्रथम मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे कार्याध्यक्ष श्री. विनय र. र. यांनी सर्वांचे स्वागत केले. अमित झोडगे यांचा परिचय करून दिला.
“2007 साली मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने अमित याला – शरद नाईक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार विद्यार्थी जीवनात काही भरीव संशोधन करणार्यांना देण्यात येतो. आज 2013 साली त्याला संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘मेरी क्युरी अर्ली स्टेज रिसर्चर फेलोशिप’ मिळत आहे. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्यापासून अमित मराठी विज्ञान परिषदेच्या कामात आहे. घोडेगाव येथे मराठी विज्ञान परिषदेचे केंद्र अमितच्या प्रयत्नांमुळे सुरू होऊ शकले.”
“अमितचा जन्म २ एप्रिल 1987ला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात दादाभाऊ आणि लता या शेतकरी जोडप्याच्या कुटुंबात झाला. घोडेगावमधील नूतन विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर पुणे शहरातील नूतन मराठी विद्यालयात बारावी पर्यंतचे शिक्षण झाले. विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण घेण्यासाठी अमितने सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ज्या ज्या शैक्षणिक आणि शिक्षणेतर उपक्रमात भाग घेण्याची संधी मिळाली ती ती त्याने घेतली. महाविद्यालयाच्या शास्त्र मंडळाचा प्रमुख म्हणून नेमणूक होण्याइतके काम त्याने केले. शास्त्र मंडळाच्या वतीने दर वर्षी प्रकल्प स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन होत असते, त्या तीन्ही वर्षं अमितने एकाच विषयावरचा प्रकल्प सादर केला. तो प्रकल्प होता जैवइंधन – बायोडिझेल या विषयावरचा. या विषयातली त्याची जाण आणि त्याचे काम किती वाढलेले आहे ते दर वर्षी त्याच्या प्रकल्पातून दिसून आले.
“पुढे रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अमितने आबासाहेब गरवारे महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या काळातही जैवइंधनावरचे त्याचे संशोधन चालूच होते. त्या कामी शेगाव येथील गजानन महाराज संशोधन संस्थेने त्याला मोलाचे सहकार्य केले. दरम्यानच्या काळात मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या कार्यातही तो सक्रिय राहिला. कार्यक्रमाचे आयोजन ते अहवाल लेखन - कोणतीही गोष्ट समाधानकारक होईपर्यंत कंटाळा येऊ न देण्याची त्याची हातोटी विशेष म्हणायला पाहिजे. आपल्या घोडेगाव या गावी मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे केंद्र सुरू करून त्याने पुणे विभागातील मान्यवर विज्ञान प्रसारकांचे तसेच विभागाशी जोडलेल्या वैज्ञानिकांचे कार्यक्रम गावकर्यांसाठी, शेतकर्यांसाठी आणि शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आयोजित केले. 2009चे आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष असो की 2010चे आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष असो की 2011चे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष त्या त्या वेळी आलेल्या संधींचा उपयोग अमितने पुरेपूर करून घेतला.”
“2009 साली अमितने स. प. महाविद्यालयाच्या वतीने पदव्युत्तर रसायनशास्त्र वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी होणार्या आंतरमहाविद्यालयीन व्याख्यान स्पर्धेत भाग घेऊन – नॅनोमेडिसीन – या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देत बक्षिस पटकावले. तसेच मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे – गोडी आणणारी कृत्रिम रसायने – या विषयावरही सर्वांना समजेल अशी मांडणी करत एक व्याख्यान दिले. अमित अवघड विषयही सोप्या पद्धतीने मांडतो याचा प्रत्यय आला.”
“2009 साली ऑगस्ट महिन्यात पुणे शहरात स्वाईन फ्लूची साथ आली. पुण्याच्या पालक मंत्र्यांनी शैक्षणिक संस्था आठ दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढून घेतला. परगावच्या विद्यार्थ्यांना गावी परत जायला सांगितले. अमितने त्याला नकार दिला. त्याचे म्हणणे – गावी परत जाणारे विद्यार्थी जाताना स्वाईन फ्लूचे विषाणू सोबत घेऊनच जातील. स्वाईन फ्लू बळावला तर पुणे शहर रुग्णांना सांभाळून वैद्यकीय मदत देण्याइतके सक्षम आहे, मात्र पुण्यातून गावात आलेल्या विद्यार्थ्यामुळे तिथे स्वाईन फ्लू पसरला तर ग्रामीण भागातली आरोग्य सेवांची दुरावस्था लक्षात घेता तिथली परिस्थिती अतिशय विदारक होऊ शकते. या कारणामुळे ‘परगावच्या विद्यार्थ्यांनी गावी परत जाऊ नये’ असे कळकळीचे आवाहन करत तो कॉलेजांमधून हिंडला. अमितचा विचार वैज्ञानिक तर्कावर आधारलेला होता.”
“पदव्युत्तर परिक्षा झाल्यावर काही खासगी कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेऊन अमितने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधनाचे काम सुरू केले. वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारी रसायने शुद्ध स्वरूपात अलग करताना सर्वात मोठा अडथळा असतो तो लिग्निन या चिकट पदार्थाचा. एखादे द्रावण वापरून लिग्निन दूर करता आले तर कितीतरी रसायने वनस्पतींमधून सहजपणे प्रदुषण न करता शुद्ध स्वरुपात मिळवता येतील. यासाठी पाणी हेच द्रावण वेगळ्या दाबाखाली आणि वेगळ्या तापमानाला वापरले तर त्याचा कितपत उपयोग होतो याबाबतच्या संशोधनात अमित कार्यरत आहे.”
“20 जानेवारी 2013ला मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या वतीने नोबेल पारितोषिक विजेते डॉ. जॉन बायर्न यांच्याशी चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘चिरंजीवी विकास’ साधण्यासाठी जगभरात चाललेल्या कामाबद्दल चर्चा होती. त्या चर्चेत आपल्या कार्याच्या आधारे अनेकांनी मांडणी केली. डॉ. आनंद कर्वे, चंद्रकांत पाठक **http://mavipapunemar13prgm.blogspot.in/2013/03/sad-demise-of-chandrakant-pathak.html,, संदीप रायरीकर, डॉ. प्रियदर्शनी कर्वे, डॉ. श्रीकांत, डॉ. आदिती पंत या निष्णात व्यक्तिंबरोबर अमित झोडगे हे नावही होते. डॉ. जॉन बायर्न यांनी आपल्या भाषणात अमितच्या कामाच्या उच्च दर्जाचा आवर्जून उल्लेख केला होता.”
“अमितला ‘मेरी क्युरी अर्ली स्टेज रिसर्चर फेलोशिप’ मिळाली याचा आपल्याला अभिमान वाटतो. त्याबद्दल त्याचं कौतुक करण्यासाठी आणि त्याच्या कामाबद्दल समजून घेण्यासाठी आपण जमलो आहोत. अमित पुण्यात आल्यापासून आजवर त्याला सतत प्रोत्साहन देणारे नू. म. वि. तून सेवानिवृत्त झालेले, तरीही ज्ञानप्रसाराची धग ज्यांना स्वस्थ बसू देत नाही, असे गणित विषयाचे शिक्षक श्री. गोखले सर आलेले आहेत. तसेच अमितचे वडील दादाभाऊ झोडगे आलेले आहेत. सर्वांचं मन:पूर्वक स्वागत. ”
अमितसारख्या विद्यार्थ्यांमुळे शिक्षणाच्या कामात अधिक हुरूप येतो असे गोखले सरांनी सांगितले.
आपल्याला मिळालेल्या फेलोशिपबद्दल बोलताना
अमित म्हणाला की -
“मला मूलभूत आणि उपयोजित संशोधन करण्याची मनापासून ऊर्मी आहे. त्यामुळे असं संशोधन करायला कुठं कुठं वाव आहे हे मी सारखं बघतंच असतो. परदेशातल्या अनेक संशोधन संस्था काही वेगळ्या प्रकारचं नवीन संशोधन करायला प्रोत्साहन देत असतात. त्या त्या ठिकाणी शिष्यवृत्ती, फेलोशिप मिळवण्याच्या दृष्टीनं माझे प्रयत्न चालू होते. साधारणपणे आधी आईनस्टाईन फेलोशिप मिळवतात मग न्यूटन फेलोशिप आणि मग मेरी क्युरी फेलोशिप या क्रमानं वाटचाल होते. मला मेरी क्यूरी फेलोशिप थेट मिळू शकली याचा मला मनापासून आनंद वाटतो. या फेलोशिपचं वैशिष्ठ्य म्हणजे फेलोशिप देणारी फौंडेशन आधी संशोधन विषय निश्चित करतात. पुढल्या दहा वर्षात कोणतं संशोधन गरजेचं आहे तो विषय निवडतात. मग त्या विषयावर संशोधन करण्याची क्षमता जगातल्या कोणकोणत्या संस्थांमध्ये आहे याची चाचपणी करून एक संस्था निवडतात. संशोधनासाठी आवश्यक त्या आधुनिक साधनसामुग्रीची भर घालण्यासाठी त्या संस्थेला कोट्यावधी रुपयांइतके अनुदान देतात. दरम्यान त्या विषयात त्या ठिकाणी कार्य करण्याची इच्छा असणार्यांकडून अर्ज मागवतात…”
“यंदाच्या वर्षी बुडापेस्टच्या विज्ञान, तंत्रज्ञान व अर्थशास्त्र विद्यापीठाची निवड करण्यात आली. या वर्षीचा संशोधनाचा विषय - “इनान्शिओसिलेक्टिव डायस्टिरिओमेरिक सॉल्ट क्रिस्टलायझेन वुइथ सीओटू” असा आहे. सुमारे 30000 अर्ज आले असावेत. त्या अर्जांची छाननी करून सुमारे 40 जणांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून अंतिम फेरीत तीन जणांना निवडण्यात आले. माझ्या बरोबरचे आणखी दोघेही चीनी होते. त्यांची शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता उच्च कोटीची होती. त्यांचे संशोधनही माझ्या संशोधनापेक्षा कितीतरी जास्त होते. त्याची माहिती मी करून घेतली होती. वैयक्तिक मुलाखती झाल्या. त्यानंतर सामुहिक मुलाखत होती. या वेळी आम्ही तिघे, फौंडेशनचे पदाधिकारी आणि बुडापेस्ट विद्यापीठातले संबंधित वैज्ञानिक असे एकत्र ऑनलाईन होतो. त्यावेळी आम्हा तिघांपैकी प्रत्येकाला – तुम्हीच या फेलोशिपसाठी इतरांपेक्षा पात्र कसे आहात ते सांगायला – सांगितलं. तेव्हा मी त्या दोघांच्या कामाचं महत्त्व सांगितलं, त्यांच्या कामाच्या दर्जाचीही प्रशंसा केली, त्यांच्यासारखं संशोधन अजूनपर्यंत माझ्याकडून झालेलं नाही हे ही मान्य केलं. मात्र मी केलेलं संशोधन मानवतेच्या भल्यासाठी आणि चिरंजीवी विकासासाठी कसं वापरता येईल ते सांगितलं. मुलाखतीच्या वेळी माझं काम आणि ज्ञान सांगतांना ते जास्तीत जास्त सोप्या शब्दात आणि साध्या साध्या उदाहरणांमधून कसं मांडता येईल याच्याकडे लक्ष दिलं. जैवइंधनाचं काम करताना तसंच विज्ञान प्रसार करताना आलेल्या अनुभवांचा या वेळी मोठा उपयोग झाला.”
फेलोशिपच्या विषयाबद्दल बोलताना अमित म्हणाला की –
“औषधी रसायने कृत्रिमरित्या करताना त्यांच्या शुद्धतेबद्दल बरीच काळजी घ्यावी लागते. ती किमान 99.99% शुद्ध असावी लागतात. त्यासाठी विशिष्ठ द्रावणे विशिष्ठ परिस्थितीत वापरली जातात. औषधी रसायने बनवतांना रासायनिक क्रियेच्या पायर्या आणि टप्पे जेवढे जास्ती असतील तितके त्यात द्रावण अडकून राहाण्याचे प्रमाण जास्ती असते. युरोपीय मानांकनानुसार औषधात एक कोटी भागात 3 तर अमेरिकी मानांकनानुसार एक कोटी भागात 1 इतके द्रावणाचे प्रमाण कमी असावे लागते. कार्बन डायॉक्साइड विशिष्ठ परिस्थितीत द्रावण स्वरुपात असतो. 730 सेल्सिअस तापमानाला आणि 20 बार दाबाला त्याची द्रावणक्षमता चांगली असते. त्या वेळी रासायनिक क्रिया झाल्यानंतर तापमान अणि दाबात थोडा फरक केला तरी कार्बन डायॉक्साइड वायू निघून जातो. औषधात द्रावण शिल्लक राहात नाही. मी एन् सी एल् मध्ये विशिष्ठ स्थितितील पाणी वापरून असे संशोधन केले आहे. पाण्यासाठी विशिष्ठ स्थितीसाठी तापमान 3730 सेल्सिअस तर दाब 220 बार इतका लागतो. मोठ्या रासायनिक भांड्यांमध्ये ही स्थिती टिकवून ठेवणे महागडे आणि जोखमीचे असते. त्यामुळे अशा रसायनांची निर्मिती मोठ्या भांड्यांमधून घाण्याघाण्यात करण्याऐवजी नळीच्या आकाराच्या क्रियाकोषात सतत चालू ठेवणे किफायतशीर ठरते. त्या दृष्टीने आमचे संशोधन चालू आहे.”
“फेलोशिपच्या काळात किमान दहा नवीन रसायने या प्रकारातून शोधून काढायचं आव्हान आहे
आणि ते मी स्विकारलं आहे. मला बुडापेस्ट विद्यापीठात काम करायचं आहे. ते विद्यापीठ अर्थशास्त्रासाठी जगात मानलं जातं. तिथं आंतरशाखीय संशोधनाला महत्त्व दिलं जातं. सध्या जगातच आंतरशाखीय संशोधनाला महत्त्व आहे आणि ते वाढत राहील असा कयास आहे. माझ्या कामात उपयोगी ठरतील अशा विविध विषयाच्या परिसंवादांना हजर राहाण्यासाठी लागणारा खर्च अनुदानपात्र असेल. हे मला विशेष सांगावसं वाटतं.”
उपस्थित सदस्यांना अमित झोडगेच्या वाटचालीबद्दल बरीच उत्सुकता होती. त्याबद्दल बरेच प्रश्न विचारले गेले. त्यांना अमितने दिलेल्या उत्तरांमधून त्याची आयुष्याची वाटचाल आणि जीवनाकडे बघण्याची त्याची दृष्टी समोर आली.
“लहानपणी शाळेला सुट्टी पडली की अमित आणि त्याचे मित्र ओढ्याच्याकाठी असणार्या करंजाच्या शेंगा गोळा करत, त्या फोडून त्यातल्या बिया पन्नास पैसे किलो या दराने विकत. चार किलो शेंगांचे 2 रुपये मिळाले की कष्टाचे चीज व्हायचे कारण त्या रकमेत चटकदार पावमिसळ खाता यायची.
“दहावीनंतर पुण्यात शिकायला आल्यावर विज्ञान इंग्रजीतून शिकायला लागले. सर्व शिक्षक भराभर इंग्रजीत शिकवत. काही समजायचं नाही. गणिताच्या गोखले सरांना ती अडचण सांगितली. त्यांनी इंग्रजी सुधारायला खूपच मदत केली. कधी एका दिवसात नवे साठ शब्द शिकवले. गोखले सर जुन्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांमधली कोरी पाने फाडून मला देत. त्याच्या वह्या करून मी वापरल्या, इंग्रजीची समज वाढायला त्या उपयोगी पडल्या. पुढे एस् पी कॉलेजात असताना मुलांची इंग्रजीची अडचण लक्षात घेऊन मी त्यांच्या इंग्रजीच्या शिकवण्या घेतल्या. इंग्रजी सोपेपणाने शिकता यावे म्हणून एक तीनशे पानी पुस्तकही काढले. टि. वाय. ला आणि पुढे एमेस्सीला असताना रसायनशास्त्र विषयाच्या शिकवण्याही घेतल्या, त्यामुळे माझा विषय पक्का व्हायला मदत झाली.”
“एस. पी. मध्ये विनय सरांकडून चांगले प्रोत्साहन मिळाले. विशेषत: शास्त्र मंडळाच्या कामात आणि मराठी विज्ञान परिषदेच्या कामातून खूपच शिकायला मिळाले. मी 80-90 टक्केवाला विद्यार्थी नव्हतो, पण आपल्या कामात सतत प्रगती करत जायला पाहिजे याचा ध्यास होता, अजूनही आहे. एन् सी एल मध्ये कॉंट्रॅक्टवर काम मिळाले तेव्हाही जितकं जास्त काम करता येईल तितकं केलं. ग्लुकोजपासून लेवुलिनिक आम्ल बनवण्याच्या एका नव्या प्रक्रियेचं एकस्वही (पेटंट) त्यानं मिळवलं. त्या आधी एका खासगी कंपनीत Knowchem मध्ये काम करताना कमीत कमी रसायनं, कमीत कमी ऊर्जा वापरून कामं करण्याचा संस्कार झाला होता त्यामुळे विनाकारण दिवे, पंखे, यंत्रं, उपकरणं चालू ठेवून कँटीनला जाणार्यांबद्दल मनात राग व्हायचा. हे संशोधन कमी आणि उधळमाधळ जास्त करतात असं वाटायचं.”
पूर्वी आपल्याकडे करंजाचं तेल मशाली पेटवण्यासाठी वापरत. त्यात वेगवेगळी तेलं मिसळत असत. त्यांचं ब्लेंड म्हणजे जैवइंधन म्हणता येईल. जैवइंधनाबाबतचे संशोधन पुढे चालू ठेवणार असल्याचे अमितने सांगितले. अनेक देशांमध्ये संशोधन चालू आहे. जैवइंधन वनस्पती तेलापासून कॉस्टिक सोड्याच्या अभिक्रियेने बनते. मात्र त्यातल्या कॉस्टिकच्या अंशामुळे आजची इंजिने लवकर खराब होतात. कॉस्टिकचा अंश कमी करण्यासाठी काही संशोधन करणे शक्य आहे. त्याशिवाय त्यातून कॅटॅकॉल, व्हॅनिलीन, व्हॅनिलिक आम्ल, सिरींजिक आम्ल, सिरींजाल्डिहाइड, 4-हैड्रॉक्सी बेंझॉइक आम्ल, 4-हैड्रॉक्सी बेंझाल्डिहाइड अशी अनेक रसायनं “हरित” पद्धतीनं निर्माण करता येतील असं अमितचं म्हणणं पडलं.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे कार्याध्यक्ष श्री. विनय र. र. यांनी अमित झोडगे यांना संस्थेतर्फे दोन पुस्तकं सप्रेम भेट दिली.
एक – जग्नमान्य रसायनशास्त्रज्ञ आणि
दुसरं – नोबेल पुरस्काराचे मानकरी;
आणि
“भविष्यात या पुस्तकांमधल्या वैज्ञानिकांच्या यादीत
अमित झोडगे हे नाव येवो”
अशा शुभेच्छा दिल्या.