Total Pageviews

Tuesday, June 18, 2013

Congratulations Amit Zodge अमित झोडगे अभिनंदन - मेरी क्युरी फेलो





(अमित झोडगे डावीकडून पहिला)

मराठी विज्ञान परिषद पुणे विभागात सक्रिय असलेला एक तरूण कार्यकर्ता अमित झोडगे याला ‘मेरी क्युरी अर्ली स्टेज रिसर्चर फेलोशिप’ मिळाली. त्याबद्दल अमितचे कौतुक करण्यासाठी 14 जून 2013 रोजी, टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे एक कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला.


सर्व प्रथम मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे कार्याध्यक्ष श्री. विनय र. र. यांनी सर्वांचे स्वागत केले. अमित झोडगे यांचा परिचय करून दिला.

2007 साली मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने अमित याला – शरद नाईक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार विद्यार्थी जीवनात काही भरीव संशोधन करणार्‍यांना देण्यात येतो. आज 2013 साली त्याला संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘मेरी क्युरी अर्ली स्टेज रिसर्चर फेलोशिप’ मिळत आहे. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्यापासून अमित मराठी विज्ञान परिषदेच्या कामात आहे. घोडेगाव येथे मराठी विज्ञान परिषदेचे केंद्र अमितच्या प्रयत्नांमुळे सुरू होऊ शकले.

अमितचा जन्म २ एप्रिल 1987ला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात दादाभाऊ आणि लता या शेतकरी जोडप्याच्या कुटुंबात झाला. घोडेगावमधील नूतन विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर पुणे शहरातील नूतन मराठी विद्यालयात बारावी पर्यंतचे शिक्षण झाले. विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण घेण्यासाठी अमितने सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ज्या ज्या शैक्षणिक आणि शिक्षणेतर उपक्रमात भाग घेण्याची संधी मिळाली ती ती त्याने घेतली. महाविद्यालयाच्या शास्त्र मंडळाचा प्रमुख म्हणून नेमणूक होण्याइतके काम त्याने केले. शास्त्र मंडळाच्या वतीने दर वर्षी प्रकल्प स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन होत असते, त्या तीन्ही वर्षं अमितने एकाच विषयावरचा प्रकल्प सादर केला. तो प्रकल्प होता जैवइंधन – बायोडिझेल या विषयावरचा. या विषयातली त्याची जाण आणि त्याचे काम किती वाढलेले आहे ते दर वर्षी त्याच्या प्रकल्पातून दिसून आले.

पुढे रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अमितने आबासाहेब गरवारे महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या काळातही जैवइंधनावरचे त्याचे संशोधन चालूच होते. त्या कामी शेगाव येथील गजानन महाराज संशोधन संस्थेने त्याला मोलाचे सहकार्य केले. दरम्यानच्या काळात मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या कार्यातही तो सक्रिय राहिला. कार्यक्रमाचे आयोजन ते अहवाल लेखन - कोणतीही गोष्ट समाधानकारक होईपर्यंत कंटाळा येऊ न देण्याची त्याची हातोटी विशेष म्हणायला पाहिजे. आपल्या घोडेगाव या गावी मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे केंद्र सुरू करून त्याने पुणे विभागातील मान्यवर विज्ञान प्रसारकांचे तसेच विभागाशी जोडलेल्या वैज्ञानिकांचे कार्यक्रम गावकर्‍यांसाठी, शेतकर्‍यांसाठी आणि शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आयोजित केले. 2009चे आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष असो की 2010चे आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष असो की 2011चे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष त्या त्या वेळी आलेल्या संधींचा उपयोग अमितने पुरेपूर करून घेतला.

2009 साली अमितने स. प. महाविद्यालयाच्या वतीने पदव्युत्तर रसायनशास्त्र वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी होणार्‍या आंतरमहाविद्यालयीन व्याख्यान स्पर्धेत भाग घेऊन – नॅनोमेडिसीन – या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देत बक्षिस पटकावले. तसेच मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे – गोडी आणणारी कृत्रिम रसायने – या विषयावरही सर्वांना समजेल अशी मांडणी करत एक व्याख्यान दिले. अमित अवघड विषयही सोप्या पद्धतीने मांडतो याचा प्रत्यय आला.
2009 साली ऑगस्ट महिन्यात पुणे शहरात स्वाईन फ्लूची साथ आली. पुण्याच्या पालक मंत्र्यांनी शैक्षणिक संस्था आठ दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढून घेतला. परगावच्या विद्यार्थ्यांना गावी परत जायला सांगितले. अमितने त्याला नकार दिला. त्याचे म्हणणे – गावी परत जाणारे विद्यार्थी जाताना स्वाईन फ्लूचे विषाणू सोबत घेऊनच जातील. स्वाईन फ्लू बळावला तर पुणे शहर रुग्णांना सांभाळून वैद्यकीय मदत देण्याइतके सक्षम आहे, मात्र पुण्यातून गावात आलेल्या विद्यार्थ्यामुळे तिथे स्वाईन फ्लू पसरला तर ग्रामीण भागातली आरोग्य सेवांची दुरावस्था लक्षात घेता तिथली परिस्थिती अतिशय विदारक होऊ शकते. या कारणामुळे ‘परगावच्या विद्यार्थ्यांनी गावी परत जाऊ नये’ असे कळकळीचे आवाहन करत तो कॉलेजांमधून हिंडला. अमितचा विचार वैज्ञानिक तर्कावर आधारलेला होता.

पदव्युत्तर परिक्षा झाल्यावर काही खासगी कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेऊन अमितने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधनाचे काम सुरू केले. वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारी रसायने शुद्ध स्वरूपात अलग करताना सर्वात मोठा अडथळा असतो तो लिग्निन या चिकट पदार्थाचा. एखादे द्रावण वापरून लिग्निन दूर करता आले तर कितीतरी रसायने वनस्पतींमधून सहजपणे प्रदुषण न करता शुद्ध स्वरुपात मिळवता येतील. यासाठी पाणी हेच द्रावण वेगळ्या दाबाखाली आणि वेगळ्या तापमानाला वापरले तर त्याचा कितपत उपयोग होतो याबाबतच्या संशोधनात अमित कार्यरत आहे.

20 जानेवारी 2013ला मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या वतीने नोबेल पारितोषिक विजेते डॉ. जॉन बायर्न यांच्याशी चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘चिरंजीवी विकास’ साधण्यासाठी जगभरात चाललेल्या कामाबद्दल चर्चा होती. त्या चर्चेत आपल्या कार्याच्या आधारे अनेकांनी मांडणी केली. डॉ. आनंद कर्वे, चंद्रकांत पाठक **http://mavipapunemar13prgm.blogspot.in/2013/03/sad-demise-of-chandrakant-pathak.html,, संदीप रायरीकर, डॉ. प्रियदर्शनी कर्वे, डॉ. श्रीकांत, डॉ. आदिती पंत या निष्णात व्यक्तिंबरोबर अमित झोडगे हे नावही होते. डॉ. जॉन बायर्न यांनी आपल्या भाषणात अमितच्या कामाच्या उच्च दर्जाचा आवर्जून उल्लेख केला होता.


अमितला ‘मेरी क्युरी अर्ली स्टेज रिसर्चर फेलोशिप’ मिळाली याचा आपल्याला अभिमान वाटतो.  त्याबद्दल त्याचं कौतुक करण्यासाठी आणि त्याच्या कामाबद्दल समजून घेण्यासाठी आपण जमलो आहोत. अमित पुण्यात आल्यापासून आजवर त्याला सतत प्रोत्साहन देणारे नू. म. वि. तून सेवानिवृत्त झालेले, तरीही ज्ञानप्रसाराची धग ज्यांना स्वस्थ बसू देत नाही, असे गणित विषयाचे शिक्षक श्री. गोखले सर आलेले आहेत. तसेच अमितचे वडील दादाभाऊ झोडगे आलेले आहेत. सर्वांचं मन:पूर्वक स्वागत

अमितसारख्या विद्यार्थ्यांमुळे शिक्षणाच्या कामात अधिक हुरूप येतो असे गोखले सरांनी सांगितले.

आपल्याला मिळालेल्या फेलोशिपबद्दल बोलताना 

अमित म्हणाला की -

मला मूलभूत आणि उपयोजित संशोधन करण्याची मनापासून ऊर्मी आहे. त्यामुळे असं संशोधन करायला कुठं कुठं वाव आहे हे मी सारखं बघतंच असतो. परदेशातल्या अनेक संशोधन संस्था काही वेगळ्या प्रकारचं नवीन संशोधन करायला प्रोत्साहन देत असतात. त्या त्या ठिकाणी शिष्यवृत्ती, फेलोशिप मिळवण्याच्या दृष्टीनं माझे प्रयत्न चालू होते. साधारणपणे आधी आईनस्टाईन फेलोशिप मिळवतात मग न्यूटन फेलोशिप आणि मग मेरी क्युरी फेलोशिप या क्रमानं वाटचाल होते. मला मेरी क्यूरी फेलोशिप थेट मिळू शकली याचा मला मनापासून आनंद वाटतो. या फेलोशिपचं वैशिष्ठ्य म्हणजे फेलोशिप देणारी फौंडेशन आधी संशोधन विषय निश्चित करतात. पुढल्या दहा वर्षात कोणतं संशोधन गरजेचं आहे तो विषय निवडतात. मग त्या विषयावर संशोधन करण्याची क्षमता जगातल्या कोणकोणत्या संस्थांमध्ये आहे याची चाचपणी करून एक संस्था निवडतात. संशोधनासाठी आवश्यक त्या आधुनिक साधनसामुग्रीची भर घालण्यासाठी त्या संस्थेला कोट्यावधी रुपयांइतके अनुदान देतात. दरम्यान त्या विषयात त्या ठिकाणी कार्य करण्याची इच्छा असणार्‍यांकडून अर्ज मागवतात…

यंदाच्या वर्षी बुडापेस्टच्या विज्ञान, तंत्रज्ञान व अर्थशास्त्र विद्यापीठाची निवड करण्यात आली. या वर्षीचा संशोधनाचा विषय - इनान्शिओसिलेक्टिव डायस्टिरिओमेरिक सॉल्ट क्रिस्टलायझेन वुइथ सीओटू असा आहे. सुमारे 30000 अर्ज आले असावेत. त्या अर्जांची छाननी करून सुमारे 40 जणांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून अंतिम फेरीत तीन जणांना निवडण्यात आले. माझ्या बरोबरचे आणखी दोघेही चीनी होते. त्यांची शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता उच्च कोटीची होती. त्यांचे संशोधनही माझ्या संशोधनापेक्षा कितीतरी जास्त होते. त्याची माहिती मी करून घेतली होती. वैयक्तिक मुलाखती झाल्या. त्यानंतर सामुहिक मुलाखत होती. या वेळी आम्ही तिघे, फौंडेशनचे पदाधिकारी आणि बुडापेस्ट विद्यापीठातले संबंधित वैज्ञानिक असे एकत्र ऑनलाईन होतो. त्यावेळी आम्हा तिघांपैकी प्रत्येकाला – तुम्हीच या फेलोशिपसाठी इतरांपेक्षा पात्र कसे आहात ते सांगायला – सांगितलं. तेव्हा मी त्या दोघांच्या कामाचं महत्त्व सांगितलं, त्यांच्या कामाच्या दर्जाचीही प्रशंसा केली, त्यांच्यासारखं संशोधन अजूनपर्यंत माझ्याकडून झालेलं नाही हे ही मान्य केलं. मात्र मी केलेलं संशोधन मानवतेच्या भल्यासाठी आणि चिरंजीवी विकासासाठी कसं वापरता येईल ते सांगितलं. मुलाखतीच्या वेळी माझं काम आणि ज्ञान सांगतांना ते जास्तीत जास्त सोप्या शब्दात आणि साध्या साध्या उदाहरणांमधून कसं मांडता येईल याच्याकडे लक्ष दिलं. जैवइंधनाचं काम करताना तसंच विज्ञान प्रसार करताना आलेल्या अनुभवांचा या वेळी मोठा उपयोग झाला.

फेलोशिपच्या विषयाबद्दल बोलताना अमित म्हणाला की –

औषधी रसायने कृत्रिमरित्या करताना त्यांच्या शुद्धतेबद्दल बरीच काळजी घ्यावी लागते. ती किमान 99.99% शुद्ध असावी लागतात. त्यासाठी विशिष्ठ द्रावणे विशिष्ठ परिस्थितीत वापरली जातात. औषधी रसायने बनवतांना रासायनिक क्रियेच्या पायर्‍या आणि टप्पे जेवढे जास्ती असतील तितके त्यात द्रावण अडकून राहाण्याचे प्रमाण जास्ती असते. युरोपीय मानांकनानुसार औषधात एक कोटी भागात 3 तर अमेरिकी मानांकनानुसार एक कोटी भागात 1 इतके द्रावणाचे प्रमाण कमी असावे लागते. कार्बन डायॉक्साइड विशिष्ठ परिस्थितीत द्रावण स्वरुपात असतो. 730 सेल्सिअस तापमानाला आणि 20 बार दाबाला त्याची द्रावणक्षमता चांगली असते. त्या वेळी रासायनिक क्रिया झाल्यानंतर तापमान अणि दाबात थोडा फरक केला तरी कार्बन डायॉक्साइड वायू निघून जातो. औषधात द्रावण शिल्लक राहात नाही. मी एन् सी एल् मध्ये विशिष्ठ स्थितितील पाणी वापरून असे संशोधन केले आहे. पाण्यासाठी विशिष्ठ स्थितीसाठी तापमान 3730 सेल्सिअस तर दाब 220 बार इतका लागतो. मोठ्या रासायनिक भांड्यांमध्ये ही स्थिती टिकवून ठेवणे महागडे आणि जोखमीचे असते. त्यामुळे अशा रसायनांची निर्मिती मोठ्या भांड्यांमधून घाण्याघाण्यात करण्याऐवजी नळीच्या आकाराच्या क्रियाकोषात सतत चालू ठेवणे किफायतशीर ठरते. त्या दृष्टीने आमचे संशोधन चालू आहे.

फेलोशिपच्या काळात किमान दहा नवीन रसायने या प्रकारातून शोधून काढायचं आव्हान आहे
आणि ते मी स्विकारलं आहे. मला बुडापेस्ट विद्यापीठात काम करायचं आहे. ते विद्यापीठ अर्थशास्त्रासाठी जगात मानलं जातं. तिथं आंतरशाखीय संशोधनाला महत्त्व दिलं जातं. सध्या जगातच आंतरशाखीय संशोधनाला महत्त्व आहे आणि ते वाढत राहील असा कयास आहे. माझ्या कामात उपयोगी ठरतील अशा विविध विषयाच्या परिसंवादांना हजर राहाण्यासाठी लागणारा खर्च अनुदानपात्र असेल. हे मला विशेष सांगावसं वाटतं.

उपस्थित सदस्यांना अमित झोडगेच्या वाटचालीबद्दल बरीच उत्सुकता होती. त्याबद्दल बरेच प्रश्न विचारले गेले. त्यांना अमितने दिलेल्या उत्तरांमधून त्याची आयुष्याची वाटचाल आणि जीवनाकडे बघण्याची त्याची दृष्टी समोर आली.

लहानपणी शाळेला सुट्टी पडली की अमित आणि त्याचे मित्र ओढ्याच्याकाठी असणार्‍या करंजाच्या शेंगा गोळा करत, त्या फोडून त्यातल्या बिया पन्नास पैसे किलो या दराने विकत. चार किलो शेंगांचे 2 रुपये मिळाले की कष्टाचे चीज व्हायचे कारण त्या रकमेत चटकदार पावमिसळ खाता यायची.
दहावीनंतर पुण्यात शिकायला आल्यावर विज्ञान इंग्रजीतून शिकायला लागले. सर्व शिक्षक भराभर इंग्रजीत शिकवत. काही समजायचं नाही. गणिताच्या गोखले सरांना ती अडचण सांगितली. त्यांनी इंग्रजी सुधारायला खूपच मदत केली. कधी एका दिवसात नवे साठ शब्द शिकवले. गोखले सर जुन्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांमधली कोरी पाने फाडून मला देत. त्याच्या वह्या करून मी वापरल्या, इंग्रजीची समज वाढायला त्या उपयोगी पडल्या. पुढे एस् पी कॉलेजात असताना मुलांची इंग्रजीची अडचण लक्षात घेऊन मी त्यांच्या इंग्रजीच्या शिकवण्या घेतल्या. इंग्रजी सोपेपणाने शिकता यावे म्हणून एक तीनशे पानी पुस्तकही काढले. टि. वाय. ला आणि पुढे एमेस्सीला असताना रसायनशास्त्र विषयाच्या शिकवण्याही घेतल्या, त्यामुळे माझा विषय पक्का व्हायला मदत झाली.

एस. पी. मध्ये विनय सरांकडून चांगले प्रोत्साहन मिळाले. विशेषत: शास्त्र मंडळाच्या कामात आणि मराठी विज्ञान परिषदेच्या कामातून खूपच शिकायला मिळाले. मी 80-90 टक्केवाला विद्यार्थी नव्हतो, पण आपल्या कामात सतत प्रगती करत जायला पाहिजे याचा ध्यास होता, अजूनही आहे. एन् सी एल मध्ये कॉंट्रॅक्टवर काम मिळाले तेव्हाही जितकं जास्त काम करता येईल तितकं केलं. ग्लुकोजपासून लेवुलिनिक आम्ल बनवण्याच्या एका नव्या प्रक्रियेचं एकस्वही  (पेटंट) त्यानं मिळवलं. त्या आधी एका खासगी कंपनीत Knowchem मध्ये काम करताना कमीत कमी रसायनं, कमीत कमी ऊर्जा वापरून कामं करण्याचा संस्कार झाला होता त्यामुळे विनाकारण दिवे, पंखे, यंत्रं, उपकरणं चालू ठेवून कँटीनला जाणार्‍यांबद्दल मनात राग व्हायचा. हे संशोधन कमी आणि उधळमाधळ जास्त करतात असं वाटायचं.

पूर्वी आपल्याकडे करंजाचं तेल मशाली पेटवण्यासाठी वापरत. त्यात वेगवेगळी तेलं मिसळत असत. त्यांचं ब्लेंड म्हणजे जैवइंधन म्हणता येईल. जैवइंधनाबाबतचे संशोधन पुढे चालू ठेवणार असल्याचे अमितने सांगितले. अनेक देशांमध्ये संशोधन चालू आहे. जैवइंधन वनस्पती तेलापासून कॉस्टिक सोड्याच्या अभिक्रियेने बनते. मात्र त्यातल्या कॉस्टिकच्या अंशामुळे आजची इंजिने लवकर खराब होतात. कॉस्टिकचा अंश कमी करण्यासाठी काही संशोधन करणे शक्य आहे. त्याशिवाय त्यातून कॅटॅकॉल, व्हॅनिलीन, व्हॅनिलिक आम्ल, सिरींजिक आम्ल, सिरींजाल्डिहाइड, 4-हैड्रॉक्सी बेंझॉइक आम्ल, 4-हैड्रॉक्सी बेंझाल्डिहाइड अशी अनेक रसायनं हरित पद्धतीनं निर्माण करता येतील असं अमितचं म्हणणं पडलं.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे कार्याध्यक्ष श्री. विनय र. र. यांनी अमित झोडगे यांना संस्थेतर्फे दोन पुस्तकं सप्रेम भेट दिली.
एक – जग्नमान्य रसायनशास्त्रज्ञ आणि 
दुसरं – नोबेल पुरस्काराचे मानकरी; 
आणि
भविष्यात या पुस्तकांमधल्या वैज्ञानिकांच्या यादीत 
अमित झोडगे हे नाव येवो 
अशा शुभेच्छा दिल्या.  

Sunday, April 21, 2013

The Draft Development Plan by PMC पुणे शहर विकास आराखडा - -काय शिजतंय -





पुणे शहर विकास आराखडा - काय शिजतंय -

 

पुण्याची मुंबई होऊ घातली आहेपुणे महानगरपालिकेने "बिल्डरांची स्वप्नपूर्ती" करायचं ठरवलं आहे.?अनेक पर्यावरण अभ्यासक आणि पुणेकर नागरीकांच्या संघटना अशा शंका घेत आहेत.

 

नेमका आराखडा काय आहे

पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाऊन पहा.

http://www.punecorporation.org/pmcwebn/dpoldvill.aspx

 

आजच जागे व्हा.

26 एप्रिल 2013 च्या आत आपले म्हणणे नोंदवा

लोकशाही राज्यातील जागरूक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणार्‍या व्यक्तींना आवाहन आहे. 

 

विनय र. र.


पुणे आराखडा - ठळक वैशिष्ठ्ये -
  • शहरातला कोणताही भूखंड महानगरपालिका ताब्यात घेऊ शकेल
  • मेट्रो मार्गावर दोन्ही बाजूला अर्धा-अर्धा किलोमीटरपर्यंत ४ चटईक्षेत्र (मेट्रो नाही झाली तरी)
  • जुन्या इमारतींच्या जागी क्षेत्रविकास करण्यासाठी ३ चटईक्षेत्र
  • ४ आणि ५ तारांकीत हॉटेले तसेच खासगी हॉस्पिटलना ४ चटईक्षेत्र 
  • मोकळ्या जागा - क्रीडा उद्याने यांच्यात घट
  • नद्या आणि तलाव पक्के बुजवून रस्ते आणि इमारती बांधणार
  • टेकड्यांवरच्या जागा, टेकडीउतार तसेच राखीव ठेवलेले हरीतपट्टे SEZ, ITपार्क आणि रंजन नगरींसाठी देणार
  • गरीबांच्या घरांसाठी, झोपड्यांसाठी काहीही तरतूद नाही.
सूचना:
आराखडा मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावा. विविध माध्यमातून उपलब्ध करून द्यावा.
त्यानंतर त्यावर मते, सूचना देण्यासाठी 30 दिवसांची मुदत द्यावी.
आलेल्या सूचनाही सर्वांना पहाण्यासाठी खुल्या असाव्यात.


Draft Development Plan - Cover Letter.pdfDraft Development Plan - Cover Letter.pdf
642K   View   Download  
Draft DP - Suggestions and Objections - Simplified.pdfDraft DP - Suggestions and Objections - Simplified.pdf
50K   View   Download  

मते, सूचना देण्यासाठी संपर्कासाठी पत्ता -


To, 
The Town Planning Officer/City Engineer 
Room No. 110, First Floor 
Pune Municipal Corporation 
Shivajinagar, Pune 411005 




मराठी विज्ञान परिषदपुणे विभागाचे वतीने दि१७ मे २०१३ रोजी संध्याकाळी ६ वाजताटिळक स्मारक मंदिर येथे चर्चासत्र सभागृहातश्रीसुजित पटवर्धन यांचे  पुणे शहर विकास आराखडा  या विषयावर व्याख्यान आयोजित केले होतेकार्यक्रमाची प्रस्तावना तसेच वक्त्यांचा परीचय श्रीविनय रयांनी करून दिलाश्रीप्रभाकर पंडीत अध्यक्षस्थानी होतेकार्यक्रमाला सुमारे पन्नास श्रोते उपस्थित होते.
श्री. सुजित पटवर्धन हे पर्यावरण विषयातील एक अभ्यासक आहेत. परीसर या संस्थेचे ते संस्थापक असून संस्थेच्या माध्यमातून पुण्याच्या पर्यावरण रक्षणासाठी लोकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्याचे काम ते करतात. त्या त्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी - संबंधित असणारे विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ यांच्याशी संवाद साधतात, प्रसंगी पर्यावरण रक्षणासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठविण्याचे कामही श्री. सुजित पटवर्धन करतात.
आपल्या मांडणीच्या सुरुवातीला पडद्यावर त्यांनी एक प्रकाशचित्र दाखवले. आज जेथे सारसबाग आहे तेथील गणपती तळ्यातला गणपती’ म्हणून ओळखला जातो, तो भाग पूर्वी पाण्याने भरलेला तलाव होता असे या प्रकाशचित्रात दिसत होते.

श्री. सुजित पटवर्धन यांच्या भाषणाचा सारांश-  
1966 च्या महाराष्ट्र विभागीय नगर रचना (एम् आर टी पी 1966) कायद्यानुसार दर दहा वर्षांनी प्रत्येक शहराने आपला विकास आराखडा बनविणे बंधनकारक आहे. त्यामध्ये नगरातील तत्कालीन रचनेचा वस्तुस्थितीपूर्ण खुलासेवार आढावा घ्यावा आणि पुढील 10 वर्षांसाठींचे नियोजनाची दिशा आणि योजना नागरिकांसमोर जाहीर करावी, त्या योजनेबाबत नागरिकांचे म्हणणे आजमावावे, आणि त्यानुसार आराखड्याला अंतिम रूप द्यावे अशी अपेक्षा आहे.
पुणे शहराचा या आधीचा विकास आराखडा 1987 साली मांडला गेला. तो त्या काळाच्या तुलनेत बघता बराच प्रगत होता. भविष्यातील मोटराईज्ड वाहनांच्या रहदारीच्या समस्येचा सामना करण्यासाठी फुटपाथसारखे – सायकल मार्ग नव्हे तर खास सायकलसाठीच्या रस्त्यांचे जाळे या आखणीत दाखविले होते. आज वाकडेवाडी येथे असणारा भुयारी मार्ग सायकलसाठीचा रस्ता होतासंभाजी पुलाच्या दोन्ही कडेचे पूल केवळ सायकलसाठीच आखलेले होते, स्कूटर-मोटरसायकलसाठी अजिबात नव्हते, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. अधिक प्रवाशांची जलद वाहतूक करणार्‍या बससारख्या वाहनांच्या वापरासाठीच असेल असा वर्तुळमार्गही त्या आराखड्यात होता, पण तो अंमलात आणण्यात आला नाही. 1987च्या आराखड्याची खूपच हेळसांड झाल्यामुळे आजच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1996 साली पुणे शहर विकास आराखडा पुढे येणे अपेक्षित होते. त्याबद्दल परिसर तसेच अनेक संघटनांनी मागणी लावून धरली. अखेर डिसेंबर 2007 मध्ये पुणे महानगरपालिका जागी झाली आणि प्राथमिक काम सुरू झाले. पुणे मनपाकडे या कामासाठी 2 पूर्ण वेळ आणि 1 अर्ध वेळ असे अडीच अधिकारी आहेत. त्यामुळे पाहणी करण्याची कामे इतर कुठल्या कुठल्या संस्थांना देण्यात आली. त्यांनाही मनपाकडून वेळेवर आणि पुरेशी आकडेवारी मिळण्यात अडचणी आल्या. त्यामुळे 2013 साली समोर आलेल्या आराखड्यात अनेक गंभीर त्रुटी आहेत. http://www.punecorporation.org/pmcwebn/dpoldvill.aspx पुणे मनपाच्या संकेतस्थळावर आराखडा इंग्रजी भाषेत पाहायला मिळेल. हे एक चारशे पानांचे दस्त आहे त्याखेरीज अनेक नकाशे आहेत. ते पाहून नागरिकांनी 26 एप्रिल 2013 पर्यंत प्रतिक्रिया द्याव्यात असे पुणे मनपाने म्हंटले होते. त्याबाबत तक्रारी झाल्यावर आता 30 जून 2013 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. पुणेकरांनी ही संधी दवडू नये. पुढची 20-25 वर्षे वाट पाहावी लागेल. जो आराखडा केला आहे त्याचे भोग भोगणे भाग पडेल.
पुणेकर नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती पुढे येऊन मांडायला पाहीजेत. हे मतदान करण्यासारखेच आपले लोकशाहीतील काम आहे. ‘परीसर’ संस्थेच्या संकेतस्थळावर आमची मते आणि सूचना आपण पाहू शकता. www.parisar.org. आपल्याला पटल्या तर आपण त्या पुणे मनपाला स्वतंत्र पत्राने पुढील पत्त्यावर पाठवा.
पुणे नगर रचना अधिकारी / शहर अभियंता,
खोली क्र. 110, पहिला मजला, पुणे महानगरपालिका
शिवाजीनगर,  पुणे 411005

कोणत्याही शहराचा पुढील 20 वर्षांचा विकास कशाप्रकारे व्हावा याची पद्धतशीर मांडणी विकास आराखड्याद्वारे होणे अपेक्षित असते. त्यात विकासाचा दृष्टीकोन मांडला गेला पाहिजे. 2013च्या आराखड्यात कोणताही ठोस दृष्टीकोन नाही. शहर विकास आराखड्याच्या रचनेत गाभाभूत भाग म्हणजे तिथली अपेक्षित लोकवस्ती. 2013च्या आराखड्यात पुढील 20 वर्षांसाठी अपेक्षित लोकसंख्या पुणे शहराने कधीच ओलांडली आहे. 2011च्या जनगणनेनुसार ती अपेक्षित लोकसंख्येपेक्षा 16% जास्त आहे. ती कमी होण्याची आराखडाकर्त्यांची अपेक्षा आहे का? असल्यास तशी योजना आराखड्यात दिसत नाही. अशा परिस्थितीत 2013च्या आराखड्याचा पायाच डळमळीत झालेला आहे.

आज अस्तित्वात असलेल्या ‘राजाराम पूल’, ‘कालवा रोड’ या ढोबळ गोष्टी नकाशात दिसत नाहीत. ‘भिडे पूल’ आणि ‘गाडगीळ पूल’ एकच असल्याचे दाखवले आहे. नदी न दाखवता केवळ नदीच्या मध्यभागी बांधलेल्या चारी ‘नदी’ म्हणून दाखवल्या आहेत. अशा मासलेवाईक ढोबळ चुका नकाशात दिसतात.

2006 साली – राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण (NUTP) घोषित करण्यात आलं. अतिशय उत्तम धोरण आहे. त्यातला गाभ्याचा मुद्दा म्हणजे ‘शहर लोकांकरता आहे, वाहनांकरता नाही, वाहने लोकांच्या सोईकरता आहेत’ म्हणजे शहराचं नियोजन वाहने नाही तर लोक मध्यवर्ती ठेऊन व्हायला पाहिजे. देशभरासाठी असलेल्या या धोरणाची दखलही पुणे विकास आराखड्यात घेतलेली नाही. रस्ते रुंद करणे म्हणजे विकास – अशी आराखडाकर्त्यांची धारणा दिसते. उड्डाणपूल बांधून वाहतुकीची समस्या सुटत नाही तर वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेऊन सुटते हे जगभरातल्या उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. त्याची जाणीव आराखडाकारांना नाही, ती करून द्यायला पाहीजे.

शहरातल्या सुपीक जमिनीचा वापर उत्तम उद्याने, बागा यांच्यासाठी होऊ शकतो, तो भाग निवासी वापरासाठी दाखवला गेला आहे, त्यात फेरबदल करावा. उच्च दर्जाची हिरवाई आजही असलेला मुळामुठा नद्यांच्या संगमाकाठचा संगमवाडी हा भाग निवासी इमारती बांधण्यासाठी वर्ग केला आहे, ते बरोबर नाही. श्रीमंतांना आपल्या भूखंडावर झाडे वाढवून हिरवाई करता येते, शहरी गरीबांना त्यासाठी शहर रचनेचाच आधार असतो. पूर्वी पुणे शहर रचनाकारांनी जंगली महाराज रस्त्यावर ‘संभाजी पार्क’-साठी जागा राखून ठेवली हा त्यांचा द्रष्टेपणाच म्हणावा लागेल.

टीपी स्कीम किंवा नगररचना योजना आखणे जवळजवळ बंदच झाले आहे. या योजनांमध्ये मोठ्या भूक्षेत्रातील लहानमोठ्या जमीन मालकांना एकत्र करून योग्य नियोजनाद्वारे भूखंड आरेखन करून रस्ते, पाणी, गटारी, बाजार, सार्वजनिक ठिकाणे, दिवाबत्ती अशासारख्या पायाभूत सुविधांची तजवीज प्लॉटस् विकसित केले जात. जमीन मालकांना आपले भूखंड ‘बिगरशेती’ करून मिळणार्‍या किमतीपेक्षा अधिक किंमत अशा सुनियोजित ‘विकसित भूखंडाला’ मिळते पण हे कार्य जवळजवळ बंदच झाले आहे. ते पुन्हा सुरू झाले पाहिजे तर योग्य तर्‍हेने शहर नियोजन होईल.


शहर विकास आराखड्यात - पर्यावरण विषयक चांगली जाण - दाखवण्याची आणि त्यासाठी - चिरस्थायी कृतीकार्यक्रम - आखण्याची अपेक्षा आहे. पुणे शहराला पर्यावरणीय वारसा म्हणून - तीन नद्या, टेकड्या, शहरी उपवने, तलाव लाभलेले आहेत. त्यांना धक्का न लावता तो टिकवून ठेवणे अजूनही शक्य आहे. त्याचा विचार आराखड्यात व्हायला हवा.

2013च्या आराखड्यात अनेक बाबी घातक आहेत. 
त्यात सर्वात मोठी घातक बाब म्हणजे मेट्रोमार्गावर देण्यात येणारा 4 एफ एस आय. बाकी सगळाकडे तो 1 ते 1.5 आहे. परदेशात जेथे लोकसंख्याच कमी आहे तेथे – लोकांनी मेट्रोमार्गाच्या आसपास वस्ती करून राहावे म्हणजे ते मेट्रो वापरतील आणि मेट्रो किफायतशीर ठरेल अशा उद्देशाने अधिक एफ एस आय दिला जातो. पुण्यात दोन मेट्रोमार्ग - एक  शिवाजीनगर ते स्वारगेट जमिनीखालून तर दुसरा वनाज ते रामवाडी रस्त्यावर पूल रस्ता उभारून -प्रस्तावित आहेत. या मेट्रोमार्गांच्या आसपास दाट वस्ती मुळातच असल्याने 4 एफ एस आय देण्याची गरज नाही. उलट 4 एफ एस आय दिल्यास लोकवस्ती प्रचंड फुगून आहेत त्या नागरी सुविधांवर ताण येऊन त्या तुटपुंज्या पडतील.

शहर नियोजनाचा सर्वात गाभ्याचा भाग म्हणजे दर हजार नागरिकांमागे उपलब्ध होणार्‍या शहरी सोयींची गणना. यात क्रीडांगणे, मैदाने, शाळा, पोस्ट, पोलिस चौक्या, दवाखाने, प्रसुतिगृहे, अग्निशमन केंद्रे, बस डेपो इत्यादी येतात. राष्ट्रीय संकेतांनुसार या सुविधांसाठी दहा हजार नागरिकांमागे 0.4 हेक्टर जागा असावी, जुन्या दाट वस्तीच्या गावठाणातही किमान 0.1 हेक्टर जागा असायलाच हवी, कोणाला शाळेसाठी 800 मीटरपेक्षा जास्त अंतर जायला लागू नये, असे मानले जाते. याचा हिशोब केला तर आजच पुणे शहरासाठी 1350 हेक्टर जागा नागरी सुविधांसाठी आवश्यक आहे. पूर्वीच्या आराखड्यात असे क्षेत्र केवळ 60%च उपलब्ध असल्याचे दाखवून 40% क्षेत्राची कसर भरून काढण्यासाठी पुणे शहरातल्या आणि हद्दीवरच्या टेकड्या मोकळ्या ठेवण्याचे घोषित केले होते. परंतु दरम्यानच्या काळात टेकडीवर 4% बांधकाम करण्यास परवानगी दिल्याने मूळ आराखडा कधीच भुईसपाट झाला आहे. 1350 हेक्टर ऐवजी 537 हेक्टर क्षेत्र उपलब्ध राहीले होते ते 2013 च्या आराखड्यात केवळ 137 हेक्टर म्हणजे प्रत्यक्ष गरजेच्या 0.93% एवढेच शिल्लक आहे.

नागरी सुविधांची वानवा आराखड्यात दिसून येते –
  • बस स्टॅण्ड    -     १३ हवेत तजवीज ५ ची
  • पोलिस चौक्या -     ३७ हव्यात तजवीज 3 ची
  • सांस्कृतिक केंद्रे -     ३४ हवीत तजवीज ३५ ची (?)
  • पोस्ट            २ हवीत तजवीज १ ची
  • प्राथमिक शाळा -     ११८ हव्यात तजवीज २८ ची
  • माध्यमिक शाळा -    २१६ हव्यात तजवीज २९ ची
  • दवाखाने      -     ७ हवेत तजवीज १ ची
  • प्रसुतिगृहे     -     १३ हवीत तजवीज ४ ची

पुणे शहराच्या पूर्वीच्या आराखड्यात – सायकल - या प्रदूषण न करणार्‍या, चालवणार्‍यांचे आणि इतरांचेही आरोग्य राखणार्‍या, दरडोई रस्ता वापर कमी करणार्‍या, लहानथोर सर्वांना चालवता येणार्‍या वाहनासाठी खास सायकल रस्त्यांचे व्यवस्थित जाळे आखले होते पण ते अंमलात आणण्यात अनेक हितसंबंधीयांनी आडकाठ्या आणल्या. आज रहदारीच्या गदारोळात आपला पाल्य सायकलने शाळेत जातो म्हटले तर पालकांना धास्तीच वाटते. आज रस्त्यावर असलेले सायकल ट्रॅक तुटक तुटक असल्याने वापराच्या लायकीचे नसतात. केंद्र सरकारकडून नागरी विकीस निधी मिळावा म्हणून केलेली ती निव्वळ धूळफेक आहे. रस्ते रुंद करण्यासाठी ते केव्हाही तोडले जाऊ शकतील.

रस्ते रुंद केले की वाहने वाढतात,
वाहने वाढली की रहदारी वाढते,
रहदारी वाढली की रस्ते रुंद केले जातात,
रस्ते रुंद केले की वाहने वाढतात.......
असे दुष्टचक्र चालूच राहाते.    

शहरामध्ये भरमसाठ उत्तुंग इमारती, वाहनांनी गच्च भरलेले रस्ते या विकासाच्या अवधारणा आहेत. पुणेकरांनी या पासून सावध रहायला हवे. 2013चा पुणे शहर विकास आराखडा पहा आणि त्यातल्या अवधारणा दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेला आपले म्हणणे कळवा.
असे कळकळीचे आवाहन श्री. सुजित पटवर्धन यांनी श्रोत्यांना केले.

Thursday, April 18, 2013

Activities of Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag

For further details about activities of Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag please click http://mavipapunevibhag.blogspot.in/

Thank You

Tuesday, April 2, 2013

Programs in April 2013

http://mavipapunevibhag.blogspot.in/2013/04/programs-in-april-2013-2013.html


मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
एप्रिल 2013 मधील कार्यक्रम
मंगळवार – 16 एप्रिल 2013, 
वेळ – संध्याकाळी 6:३0
व्याख्यान : 
दुष्काळ हटवणे शक्य आहे

वक्ते – श्री. मेहेर गाडेकर.

स्थळ – दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, जंगली महाराज चौक, शिवाजीनगर, पुणे 5

शुक्रवार – 19 एप्रिल 2013, वेळ – संध्याकाळी 6
व्याख्यान : 
गणित आणि भौतिकशास्त्र

वक्ते – प्रा. अतुल फडके
स्थळ – टिळक स्मारक मंदिर, चर्चा सभागृह, टिळक रस्ता, पुणे 30

शनिवार – 20/27 एप्रिल 2013 वेळ – दुपारी 1 ते 5.
.कार्यशाळा  
रचनेतून नवरचना

शुल्क रु. 150/-फक्त . .
इ.6वी ते 8वी तील 25 विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक दिवसाची कार्यशाळा
मार्गदर्शक – श्री. भालचंद्र गोंधळेकर   
स्थळ – ज्ञानप्रबोधिनी, सदाशिव पेठ, पुणे 30
पूर्वनोंदणी आवश्यक. 
संपर्क श्री. संजय मा. क. 9552526909 ई-मेल mavipa.pune@gmail.com
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030


रविवार – 21/28 एप्रिल 2013 वेळ – सकाळी 10 ते संध्याकाळी 5.

अभियांत्रिकी मनोवृत्ती 

Engineering Mindset 

एक दिवसाची कार्यशाळा – 

शुल्क रु. 250/- फक्त

इंजिनीअर होण्याची आकांक्षा असणार्‍या 9वी-12वीतील 25 विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी
मार्गदर्शक – श्री. भालचंद्र गोंधळेकर   
स्थळ – ज्ञानप्रबोधिनी, सदाशिव पेठ, पुणे 30 
पूर्वनोंदणी आवश्यक. 
संपर्क श्री. संजय मा. क. 9552526909 ई-मेल mavipa.pune@gmail.com
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
मे 2013 मधील कार्यक्रम

1 मे : 



वासंतिक 



वन विहार

स्थळ : मढे घाट, जि. पुणे

पावसाळ्यातलं हिरवंकंच जंगल पाहून हरखून जायला होतं.
यंदा उन्हाळ्यातलं जंगल बघण्यासाठी खास सहल आयोजित केली आहे.
उन्हाळ्यात पाने झडलेली असली तरी कितीतरी वृक्ष फुलांनी बहरलेले असतात, 
फुलातल्या मधासाठी कीटक, फुलपाखरे यांची लगबग सुरू असते, 
अनेक प्रकारच्या पक्ष्यांचे विणीचे हंगाम असतात. 
आकाशातून सूर्य आपला प्रकाश आणि ऊबारा भरभरून देत असतो. 
अशा मोसमात निसर्गाचे एक वेगळे रूप बघायला मिळणार आहे. 
या जंगलाचा एक फेरफटका मारू या !

टोपी, बूट, पाण्याची बाटली आवश्यक, दुर्बीण असेल तर उत्तम. 
1 मे 2013 ला टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 30 इथून 
सकाळी 6:30 ला निघून संध्याकाळी 8पर्यंत परतायचं.
सहल खर्च प्रत्येकी रु. 500 फक्त. (सभासदांना 10% सवलत). 
प्रवास, नाश्ता, जेवण, चहा सहलखर्चात समाविष्ट. 
पूर्वनोंदणी आवश्यक. 35 व्यक्तिंसाठी मर्यादीत.
संपर्क : संजय मा. क., 9552526909 विनय र. र. 9422048967, 
ई-मेल mavipa.pune@gmail.com

ताज्या माहितीसाठी आमच्या ब्लॉग पहा – http://mavipapune.blogspot.in