Total Pageviews

Wednesday, February 20, 2013

मराठीभाषा डॉट कॉम www.marathibhasha.com


मराठीभाषा डॉट कॉम
          मागील वर्षी जागतिक मराठी दिन २७ फेब्रु. २०१२ या दिवशी एका संगणकाची पालखीतून मिरवणूक निघाली होती. पुण्याचे ग्रामदैवत  कसबा गणपती मंदिरापासून निघालेली  मिरवणूक लाल महाल, मजूर अड्डा, अप्पा बळवंत मेहेंदळे चौक, रमणबाग चौक, पत्र्या मारुती, नूमवि, लिंबराज महाराज चौक, शनिपार, संगम चौक  या मार्गाने निंबाळकर तालीम जवळच्या सदाशिव पेठेतील एका वाड्यासमोर एका सभेत रुपांतरीत झाली. या वाड्यात कुसुमाग्रज राहत असत, आणि त्यांचा वाढदिवस जागतिक मराठी दिवस म्हणून साजरा होतो, म्हणून या ही मिरवणूक तिथे विसर्जित केली.  एखाद्या संगणकाची पुण्यातून मिरवणूक काढण्याचा तो पहिलाच प्रसंग होता.
            काय होते त्या संगणकात? त्या संगणकात २, ६७००० इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द संगणकावरून सहज पाहण्यासाठी निर्माण केलेल्या एका संकेतस्थळाची सामग्री होती. जेष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. रा. ग. जाधव यांनी एक कळ दाबून हा मौल्यवान खजिना मराठी आणि अमराठी जनतेसाठी उपलब्ध केला. www.marathibhasha.com  हे या संकेतस्थळाचे नाव आहे आणि तोच त्याचा पत्ताही आहे. या संकेतस्थळावर असलेले सर्व शब्द आणि शब्दार्थ महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पारिभाषिक कोशातील आहेत. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, औषधनिर्माण, मानसशास्त्र, शासन व्यवहार कोश, शासकीय पत्रलेखन कोश, पदनाम कोश यासह शासनाच्या ३५ पारिभाषिक कोशांमधील सर्व इंग्रजी मराठी शब्द प्रत्यक्ष टंकित करून त्यांचा साठा या संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे.  इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द आणि मराठी शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द शोधण्यासाठी शोध सुविधाही उपलब्ध आहे.
संजय भगत या मराठीप्रेमीने स्वखर्चाने हा उपक्रम केला आहे२००१ पासून या संकेतस्थळाचे काम सुरु झाले आणि २००८ मध्ये हे स्थळ संगणकीय जाल्यावर दिसू लागले.  या संकेतस्थळाचा नियमित खर्चही कोणत्याही जाहिराती न घेता ते स्वत: भागवतात. संकेतस्थळाच्या जाहिरातीसाठी कोणताही विशेष प्रयत्न केला नसूनही केवळ सांगीवांगी तोंडी प्रचारामुळे www.marathibhasha.com  ची माहिती जगभर पोचली आहे. एका वर्षात ६५ देशातील २४१४७ व्यक्तींनी या संकेतस्थळास ४५०५१ भेटी दिल्या. प्रत्येक भेटीत सरासरी ६ पाने पहिली गेली आणि भेटकर्त्यांनी प्रत्येक भेटीत इथे सरासरी ८ मी. १७ से. वेळ दिला. संकेतस्थळातून  श्री. भगत कोणतेही उत्पन्न मिळवित नसल्याने संकेतस्थळाच्या प्रसिद्धीसाठी लागणारा अफाट खर्च त्यांनी करावा अशी अपेक्षा करणे योग्य वाटत नाही. मी सर्व मराठी भाषकांना आवाहन करतो की, या संकेतस्थळाची प्रत्येकाने जमेल तितकी प्रसिद्धी करावी.
पत्रकार, विपणन कर्मचारी, बांधकाम व्यावसायिक, औद्योगिक मनुष्यबळ विभाग, उत्पादक, वैज्ञानिक, शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, लेखक, कवी, भाषांतरकार, जाहिरात लेखक, संवाद लेखक, कलाकार, राजकीय नेते,  सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, औषध विक्रेते, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय व्यावसायिक,  आणि अनेक क्षेत्रातील सर्वांना उपयुक्त ठरणाऱ्या या सेवेचा सर्वांनी लाभही घ्यावा, आणि भरपूर प्रचार करावा, हे आवाहन !
अधिक माहितीसाठी : मराठीकाका, प्रा. अनिल  गोरे. समर्थ मराठी संस्था, ७०५ बुधवार पेठ, पुणे ४११००२.
बोला ९४२२००१६७१ वी-पत्र पाठवा marathikaka@gmail.com पहा www.samarthmarathi.com           

3 comments:

  1. मी फेसबुक वर या संकेतस्थळाची माहिती दिली आहे. अतिशय उपयुक्त संकेतस्थळ आहे. आणखी काही मदत लागल्यास सांगा.

    ReplyDelete
  2. मराठी भाषा अधिक समृद्ध करू या.
    + अधिक वेळा वापरून
    + अधिक ठिकाणी वापरून
    + अधिक विषयात वापरून
    + अधिक लोकांबरोबर वापरून
    +
    +
    +

    ReplyDelete